मुंबई - कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरात लोकांचे हाल पाहायला मिळाले. भारतातील लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली आहे. बर्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांनी इतर उदरनिर्वाहाचा शोध घेतला. मुंबईत आईची नोकरी गेल्याने एका 14 वर्षाच्या मुलावर अभ्यास सोडून चहा विकण्याची वेळ आली आहे.
14 वर्षीय सुभान शेख हा मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील रहिवासी आहे. आजकाल तो भेंडी बाजार परिसरातील चहाच्या दुकानात काम करताना दिसतो. तो हातात चहाची किटली व ग्लास घेऊन दुकानात चहा वाटतो. वास्तविक या मुलाच्या आईने लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावली आणि बहिणीचा ऑनलाइन वर्ग खर्चही वाढला. त्यामुळे बहिणीचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी व घर चालवण्यासाठी मुलाने आपला अभ्यास सोडला व चहा विकायला सुरुवात केली आहे.
बहिणीचे शिक्षण ठेवले सुरू
सुभानच्या वडिलांचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यावेळी तो अवघ्या दोन वर्षांचा होता. आई शाळेत आया म्हणून काम करायची. जेव्हा शाळा लॉकडाऊनमध्ये बंद पडल्या तेव्हा त्यांची नोकरी गेली. नोकरी सोडल्यानंतर कुटुंबाला पोटा-पाण्याचा त्रास झाला. सुभानचा अभ्यासही थांबला. सुभानची बहिणही शिक्षण घेत आहे. आपल्या लहान बहिणीने तिचा अभ्यास चुकवावा अशी त्याची इच्छा नव्हती, म्हणूनच त्याने आपले शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन उघडताच त्याला चहाच्या दुकानात नोकरी मिळाली. त्यातून तो एका दिवसात 300 रुपये कमवू लागला व घर चालवू लागला.
कमवू लागल्याने तो बहिणीचा ऑनलाइन अभ्यासही मोबाईल घेऊन करत आहे. सर्व शाळा उघडल्यानंतर तो देखील पुन्हा अभ्यास सुरू ठेवेल आणि कामही करेल, असे सुभानने सांगितले. मिळणाऱ्या पैशातून घरातील खर्चाव्यतिरिक्त तो काही पैशांची बचतही करतो. जेणेकरून शाळा उघडल्यानंतर त्याचा अभ्यास चालू राहू शकेल, असे देखील सुभानने सांगितले.