मुंबई - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बारावीच्या परीक्षांपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून परीक्षेच्या आदल्या दिवसांपर्यत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बारावीचे विद्यार्थी संभ्रमात
नियोजित वेळेनुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल २०२१पासून तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. गेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बारावीची परीक्षा संदर्भात कोणाताही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बारावीची परीक्षा अद्याप रद्द करण्यात आली नसून त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहेत. तसेच आता बारावीच्या परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मे महिन्याचा अखेरीस होईल परीक्षा
कोरोनाच्या संकट काळात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तणावाखाली सुरू आहे. परीक्षेविषयी अस्वस्थता आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विविध पक्षीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आदींसोबत चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वप्रथम जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच बारावीची परीक्षा मे महिण्याच्या अखेरीस होईल, जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी प्रक्रिया शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.