मुंबई - काम्या कार्तिकेयन या १२ वर्षीय विद्यार्थिनीने जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान पटकावला आहे. काम्या कार्तिकेयनने दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधील 'अॅकॉन्ग्वा' हे सर्वोच्च शिखर सर केले आहे. या शिखरावर यशस्वी चढाई करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा विक्रमदेखील तिने केला आहे. तिच्या प्रवासाविषयी आणि अनुभवाविषयी तिच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
काम्या ही भारतीय नौदलाच्या मुंबई नेव्ही चिल्ड्रन स्कूलची इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी आहे. तिने अॅकॉन्ग्वा शिखरावर १ फेब्रुवारीला तिरंगा ध्वज फडकवल्याची माहिती संरक्षण दलाकडून देण्यात आली होती. काम्याचे वडील एस. कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर, तर आई लावण्या पूर्व प्राथमिक शिक्षिका आहे. काम्या गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी लहानपणापासूनच वडिलांसोबत फिटनेसचे प्रशिक्षण घेत आहे. काम्या ती राहते त्या इमारतीचे 15 मजले रोज पाठीला सहा किलोची बॅग लावून चढ-उतार करते. तसेच आई तिच्या मानसिक आणि खाण्यापिण्याच्या सोयीकडे कायमच लक्ष ठेवत असते. डोंगर चढाई करताना फिटनेसची आवश्यकता असते, ते जपण्यासाठी लहानपणापासूनच ती शारीरिक आणि मानसिक तयारी करत आली आहे. काम्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्येही सहभागी होत असते. वडील कमांडर एस. कार्तिकेयन यांच्याबरोबर काम्या लहानपणापासूनच फिटनेसचे प्रशिक्षण घेत आहे. तसेच काम्या जेव्हा प्रवासासाठी जाते, तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. कारण सर्व काळजीपूर्वक नियोजन करून निसर्ग आमच्या मुलीची काळजी घेईल, अशी खात्री आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही निश्चिंत असतो, असे तिची आई लावण्या यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
तसेच काम्याचे वडील स्वत: अनुभवी व पट्टीचे गिर्यारोहक आहेत. हिमालयातील खडतर गिर्यारोहणाच्या सुरस व साहसी कथा ऐकून तिनेही गिर्यारोहणाची स्फूर्ती घेतली. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली मी गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरवले, असे काम्याने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
दरम्यान, वयाच्या तिसऱ्या वर्षी काम्याने लोणावळा परिसरातील सह्याद्रीच्या डोंगरांवर प्राथमिक ट्रेकिंग केले. नवव्या वर्षी काम्याने ५ हजार २० मीटर उंचीच्या रूपकुंडसह हिमालयातील अनेक शिखरे आई-वडिलांसोबत सर केली आहेत. वयाच्या १०व्या वर्षी नेपाळमधील ५ हजार ३४२ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई तिने केली. त्यानंतर लगेच लडाखमधील स्टोक कांगडी (६,१५३ मीटर) शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरण्याचा मान तिला मिळाला. त्याच्या पुढील वर्षात किलिमांजारो (५,८९५ मीटर), एलब्रुस (५,६४२ मीटर) आणि कॉस्कीयुस्को (२,२२८ मीटर) या अनुक्रमे आफ्रिका, युरोप व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच शिखरांवर यशस्वी चढाई तिने केली आहे. आताच ६ हजार ९६२ मीटर उंचीचे अॅकॉन्ग्वा शिखर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर तिने सर केले आहे. या तिच्या विक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेतली आहे. तिला 'लिम्का बुक' आणि 'इंडिया बुक' मध्ये नाव नोंदवण्यासाठी संधी आलेली आहे. लवकरच तिचे नाव यात नोंदवले जाणार आहे.
काम्याला पुढे 'साहसवीरांचा ग्रँड स्लॅम' पूर्ण करण्याचा निश्चय आहे. यात सर्व खंडांमधील सर्व सर्वोच्च शिखरे सर करून दक्षिण व उत्तर ध्रुवावर स्कीइंग काम्याला करायचे आहे. आजवर मोजकेच साहसवीर हे करू शकले आहेत. त्यात काम्यादेखील पुढील वर्षात आपले नाव नोंदवणार आहे. काम्याचा सत्कार करताना तिची जिद्द व आत्मविश्वासाचे कौतुक नौदलाने केले आहे. काम्याचे यश हे भारतासाठी अभिमानास्पद आहे. आतापर्यंत काम्याचा हा प्रवास तिच्या आईबाबांनी आपल्या खर्चातून केला आहे. परंतु, जागतिक पातळीवर अजून तिला पुढे जाण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे काम्या मदतीसाठी आवाहन करत आहे. भविष्यातील सर्व साहसी उपक्रमांना तिला संपूर्ण सहकार्य मिळावे, असेदेखील आवाहन ती लोकांना करते. मात्र, असे असतानाही तिने केलेल्या या विक्रमाची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत तिच्या घरच्यांनी व्यक्त केली.
दिल्लीचा निकाल लागताच भाजपनं सर्वसामान्यांना दिला 'महागाईचा झटका'
सिंचन घोटाळा प्रकरणी ७ गुन्हे दाखल, बडे अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात
'चंद्रकांत पाटलांना खुर्चीचा दगा, शिवसेनेचे नाव घेताच पडता-पडता वाचले'