मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता पुन्हा काहीशी गती मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकल्पासाठी National High-Speed Rail Corporation Limited ला पालघरमधील 12 गावांनी आपली जमीन देण्यास परवानगी दिली आहे. ग्रामसभेमध्ये पालघर मधील या 12 गावांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्यास मंजुरी दिली आहे.
12 गावांचा हिरवा कंदिल -
मोदी सरकारच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमधून जाणार आहे. मागील महिनाभरात पालघर जिल्ह्यातील 12 गावांनी बुलेट ट्रेन प्रकल्पला हिरवा कंदिल दिला आहे. मागील महिन्यात 12 गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आतापर्यंत 19 गावांनी बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी ठराव मंजूर केले आहेत. पालघरचे भूसंपादन अधिकारी संदीप पवार यांनी ही माहिती दिली असून पालघर तालुक्यातील अजूनही 11 गावांची मंजुरी येण्याची बाकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
11 गावांचा अजूनही विरोध -
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई अशा चार तालुक्यांतील तब्बल 71 गावांमधून या बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. यापैकी आतापर्यंत 60 गावांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आपली संमती दिली आहे, तर 11 गावांचा अजूनही या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती