मुंबई - राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यानंतर पुन्हा काही अधिकाऱ्यांना नवे कार्यभार देण्यात आले. आघाडी सरकारने गेल्या महिनाभरात 28 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतरही आज पुन्हा 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आज करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यात प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी वलसा नायर सिंग (1991) यांची पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त व्ही.पी.फड यांना पदोन्नती मिळून आयएएस अधिकारी म्हणून बढती देत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आलाय.
श्री साईबाबा संस्था ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.के. बगाटे यांना पदोन्नती मिळाली असून आयएएस अधिकारी म्हणून बढती देत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर केले आहे. एस.एल. पाटील यांना पदोन्नती मिळाली आहे. महानंदचे महाव्यवस्थापक म्हणून ते कार्यभार सांभाळतील.
नाशिकचे महसूल उपायुक्त डी.एस. स्वामी यांना पदोन्नती मिळाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. पुणे विभागाचे उपायुक्त एस.आर.चव्हाण यांची जलस्वराज प्रकल्प नवी मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिडकोचे अतिरिक्त कलेक्टर के.एस. तावडे यांना पदोन्नतीने आयएएस अधिकारी पदावर बढती देत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या महाव्यवस्थापक पदावर पाठवण्यात आले आहे.
पुण्याच्या पीएमआरडीए (एसजी) अतिरिक्त आयुक्त के.व्ही. द्विवेदी यांना पदोन्नतीने आयएएस अधिकारी म्हणून बढती देत पुण्याच्या पीएमआरडीएच्या अतिरिक्त मेट्रोपॉलिटन आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर विभाग महसूल विभागाचे उपायुक्त एस.बी. तेलंग यांना पदोन्नतीने आयएएस अधिकारी म्हणून बढती देत महाराष्ट्र स्टेट को. ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एस.टी. टाकसाळे यांना ट्रायबल डेव्हलपमेंट, नागपूरच्या अतिरिक्त आयुक्त या पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. नाशिक विभाग पुरवठा विभागाचे उपायुक्त पी.के. पुरी यांना पदोन्नतीने आयएएस अधिकारी म्हणून बढती देत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग मुंबई येथे जॉइंट सेक्रेटरी करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सी.डी. जोशी यांना पदोन्नतीने आयएएस अधिकारी म्हणून बढती देत महाराष्ट्र राज्य कॉमन परीक्षा विभागाच्या आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे.