मुंबई - राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 100 जण अद्यापही बेपत्ता असून 50 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 3 हजार 228 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा - मुंबईतील डी मार्ट मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन, स्टोअर केले सील
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने थैमान घातल्याने अनेकांचे जीव गेले. खासकरून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 52 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. तर, तिथेच 53 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासोबतच चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर, काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचे जीव गेले. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार राज्यात आतापर्यंत 113 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेला आहे. तर, अद्यापही शंभर लोक बेपत्ता आहेत.
जिल्हा निहाय आकडेवारी
रायगड- 52 मृत्यू, 53 बेपत्ता, 28 जण जखमी, तर 30 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
रत्नागिरी - 21 जणांचा मृत्यू, 14 जण बेपत्ता, सात जण जखमी, तर 115 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर - 7 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता, तर 27 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
सातारा - 13 जणांचा मृत्यू, तर 27 जण बेपत्ता आहेत. मात्र, साताऱ्यामध्ये जनावरांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात झाला आहे. इथे 3 हजार 24 जनावरांचा मृत्यू पूर परिस्थितीमुळे झालेला आहे.
सिंधुदुर्ग- 2 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता, तर 1 व्यक्ती जखमी झाली आहे.
मुंबई - 4 जणांचा मृत्यू, तर 7 जण जखमी झाले आहेत.
पुणे - 2 जणांचा मृत्यू, तसेच सहा जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
ठाणे - 12 जणांचा मृत्यू, सहा जण जखमी, चार जण बेपत्ता, तर दहा जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पूरजन्य परिस्थिती आणि दरड कोसळल्यामुळे राज्यामध्ये एकूण आतापर्यंत 113 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर तिथेच शंभर जण अद्यापही बेपत्ता आहेत. किरकोळ आणि गंभीर अशी जखम होऊन पन्नास लोक जखमी झाले आहेत. तसेच, संपूर्ण राज्यभरात 3 हजार 228 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. रायगड रत्नागिरीची गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्याला तात्काळ प्रत्येकी दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर तिथेच इतर जिल्ह्यांना प्रत्येकी पन्नास लाखांची मदत देण्यात आली आहे.
हेही वाचा - पेगासस हेरगिरीसाठी पैसे कुणी दिले? हे कळले पाहिजे; संजय राऊत यांची केंद्रावर अप्रत्यक्ष टीका