मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. साेमवारी महामंडळाने ११० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर पोहचली आहे. या शिवाय आतापर्यंत महामंडळाने ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत आज 8 हजार 82 कोरोना रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू
२ हजार ६११ कर्मचाऱ्यांना बाजवली नोटीस
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप चांगलाच चिघळला असून, मागील दोन महिने होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरूच ठेवली आहे. महामंडळाने आतापर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २ हजार ६११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. तर, साेमवारी महामंडळाने ११० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर पोहचली आहे.
८० आगार संपामुळे बंदच -
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील २५० आगारांपैकी १७० आगार सुरू झाली असून अजूनही ८० आगार संपामुळे अजूनही बंद असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - संपूर्ण प्रकरणाचा छडा लागत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार - नवाब मलिक यांचा इशारा