मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा होतील असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नसल्याचे खुद्द शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी पालक आणि काही शिक्षण संघटनांनी केली होती, मात्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात बोर्डाचा विरोध होता. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विचारले असता, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही, असे बोर्डाने म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून परीक्षांचा निर्णय घेऊ, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
ऑनलाईन परीक्षा का शक्य नाही?
राज्यात दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नसल्याचे एकमेव कारण म्हणजे ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सुविधांचा आजही अभाव आहे. तसेच राज्यातील दहावी -बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेत असताना सिस्टम हँग झाल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे बोर्डाचे मत आहे. तसेच ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर पुन्हा सर्व तयारी करावी लागेल. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे, शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३१ लाख इतकी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी येऊ शकतात. त्यातच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या ग्रामीण भागात आहे. सध्या शहरी भागातही इंटरनेटचा वेग मंदावल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.