मुंबई - रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (एनएचआय)ने फास्टटॅग अनिवार्य केले आहे. यापुढे फास्टटॅगला मुदतवाढ मिळणार नसल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा'च्या (एमएसआरडीसी) टोलनाक्यांवर मात्र 100 टक्के फास्टटॅगची अंमलबजावणी मार्चपासूनच होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक, विजय वाघमारे यांनी दिली आहे.
महत्वाच्या, मोठ्या टोलनाक्यावर फास्टटॅगची अंमलबजावणी सुरू असून साधारणतः मार्गिका हायब्रीड अर्थात रोख रक्कम भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. तर 100 टक्के अंमलबजावणी मार्चपासूनच होईल. पण असे असले तरी शक्य तितक्या लवकर सर्व वाहनचालकांनी फास्टटॅग लावणे आता गरजेचे आहे. कारण फास्टटॅग नसेल तर वाहतूक पोलिसांकडून आता कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना चुकून हायब्रीड मार्गिके ऐवजी फास्टटॅग मार्गिकेवरून गेला तर दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
म्हणून फास्टटॅग इलेक्ट्रॉनिक प्रणाली-
देशातील सर्वच टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाया जाते. तर टोलवसुलीमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने टोल वसुलीसाठी फास्टटॅग ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणली. जानेवारी 2020 मध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली. मात्र कोट्यवधी संख्येने फास्टटॅग उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने तसेच ही प्रणाली सर्वच्या सर्व टोलनाक्यांवर कार्यान्वित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली. पुढे कोरोनाकाळ सुरू झाला आणि पुढे मुदतवाढ वाढतच गेली. पण आता मात्र यापुढे फास्टगला मुदतवाढ मिळणार नसल्याचे म्हणत गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 100 टक्के फास्टटॅगची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर याआधीच अंमलबजावणी-
एमएसआरडीसीच्या सर्व टोलनाक्यांवरही आता फास्टटॅग अनिवार्य असणार आहे. वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग या महत्त्वाच्या मार्गावर फास्टटॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू केली आहे. तर लवकरच मुंबई एन्ट्री पॉईंटवर आणि सातारा-कागल महामार्गावर ही फास्टटॅग 100 टक्के कार्यान्वित होणार आहे. दरम्यान 100 टक्के फास्टटॅग अंमलबजावणी सुरू केलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना काहीसा दिलासा देण्यासाठी दोन मार्गिका हायब्रीड मार्गिका म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. जेथे वाहनचालक फास्टटॅग नसेल तर रोख रक्कम भरत पुढे जाऊन फास्टटॅग खरेदी करेल. जनजागृतीच्या हेतुने ही मार्गिका ठेवण्यात आली असून ती काही काळासाठीच असणार आहे. त्यामुळे ही मार्गिका रद्द केल्यास येथून विनाफास्टटॅग प्रवास करणे महागात पडणार आहे. दरम्यान आता फास्टटॅग अनिवार्य झाले असून विना फास्टटॅग प्रवास केल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील एमएसआरडीसीच्या उर्वरित टोलनाक्यावर मात्र मार्चच्या मध्यावर वा मार्च अखेरीस 100 टक्के फास्टटॅग अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.
फास्टटॅग लावून घ्याच-
राज्यात मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सी लिंक, सातारा-कागल वगळता इतर टोलनाके छोटे आहेत. त्यामुळे मोठ्या टोलनाक्यावर शक्य तितक्या लवकर फास्टग प्रणाली कार्यान्वित करत मग छोट्या टोलनाक्याकडे वळत तिथेही 100 टक्के फास्टग अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे. राज्यात सर्व टोलनाक्यावर 100 टक्के फास्टटॅग अंमलबजावणी सुरू होण्यासाठी अजून एक महिना आहे. पण असे असले तरी शक्य तितक्या लवकर सर्व वाहनांना वाहनचालकांनी फास्टटॅग लावून घेणे गरजेचे आहे. कारण आता ज्याप्रमाणे पियूसी नसेल तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याप्रमाणे फास्टटॅग नसेल तर वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार 1 जानेवारी पासून वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याच कायद्यानुसार वाहतूक पोलीस विना फास्टटॅग वाहनांविरोधात कारवाई करू शकतात. तेव्हा फास्टटॅग खरेदी करा, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता