कोल्हापूर - गोव्याला फिरायला गेलेल्या 11 जणांचा अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. गोव्यामधील मापसा येथे हा प्रकार घडला असून गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील 11 तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री गोव्यात घडली. या घटनेनंतर पीडित तरुण गेले दोन दिवस भीतीच्या छायेत वावरत आहेत.
हेही वाचा - Succeed In UPSC : आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही कोल्हापूरच्या स्वप्नील मानेचे यूपीएससीत यश
मुलं भीतीच्या छायेत - याप्रकरणी संरक्षण द्यावे अशी मागणी चंदगड पोलिसात तरुणांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड ( Chandgad taluka youth loot goa ) तालुक्यातील 11 तरुण गोव्याला फिरायला गेले होते. गोवा फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना गोव्यातील काही अज्ञातांनी त्यांना बोंडगेश्वर मंदिराशेजारी अडविले. आमच्या हॉटेलमध्ये चांगले जेवण मिळेल अशी फुस लावून त्यांना एका खोलीत कोंडले. त्याचबरोबर त्या सर्वाना मारहाण करून, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले. त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, सोन्याची अंगठी व चेनही काढून घेतले. तसेच सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे देखील उकळले.
ही घटना कुणाला सांगितल्यास तुमचे उघडे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू आणि जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाने हे सर्व तरुण हादरले असून गेल्या दोन दिवसांपासून भीतीच्या छायेत व प्रचंड तणावाखाली वावरत होते. सध्या अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत तरुण गावी आले आहेत. चंदगड पोलीस ठाणे गाठत संरक्षणासाठी निवेदन दिलेले आहे.