कोल्हापूर - कर्जमाफ करा, अन्यथा आम्हाला गोळ्या घालून रस्त्यावरच मारा, असे म्हणत महिलांनी तारारणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.
फायनान्सच्या कर्जमाफीसाठी आज (दि. 22 सप्टें.) कोल्हापुरात हजारो महिला रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. टाळेबंदी जाहीर झाल्यापासून महिलांच्या हाताला रोजगार नाही, अशात फायनान्स कंपनीने वसुलीसाठी तगादा लावला आहे. वारंवार कर्जमाफीची मागणी करून देखील राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असल्याचे महिलांनी सांगितले.
जोपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार अशी भूमिका महिलांनी घेतली होती. मात्र, एका प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महिलांनी माघार घेतली.
दरम्यान, या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी कोरोनाबाबतच्या कोणत्याच नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा -तुम जमींवालो पर रहम करो..ऊपरवाला आपपर रहम करेगा; 'त्यांनी' 200 कोरोना मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार