कोल्हापूर - महापुरातील नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. नुकसान भरपाईसाठी कोल्हापुरातील छत्रपती शासन महिला आघाडीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलन केले. यावेळी महिलांनी चक्क राष्ट्रीय महामार्गावरच संसार थाटत तीव्र घोषणाबाजी केली. काही काळ महामार्ग रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराने अक्षरशः थैमान घातले होते. अनेकांचे व्यवसाय अक्षरशः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सरकारने सर्वच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. 5 हजार रुपये रोख सानुग्रह अनुदान आणि 10 हजार रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा करू, असे जाहीर केले होते. पण अनेकांना अद्याप 10 हजार रुपये मदत खात्यावर जमाच झाली नसल्याचे चित्र आहे. यासह अनेक आश्वासने सरकारने दिली होती ती 4 महिने उलटून गेली तरीही पूर्ण केली नाही.
शेतकऱ्यांवर मोठे संकट असताना त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही याच्या निषेधार्थ छत्रपती महिला आघाडीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. आम्हाला ताबडतोब नुकसानभरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सुद्धा महिलांनी दिला.