कोल्हापूर - मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर ठाकरे सरकारने समाजासाठी एकही निर्णय घेतला नसल्याची टीका विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) केली आहे. तसेच शिवसेना कोणत्याच आरक्षणावर का बोलत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजासाठी विशेष राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा सरकारचा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे. एका राज्यात 2 मागासवर्गीय आयोग असूच शकत नाहीत, असे ते म्हणाले आहेत. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकार मराठा समाजाला वेड्यात काढत आहे -
तसेच मराठा आरक्षण हवे असेल तर हे प्रकरण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सोपवून त्यांच्याकडून योग्य सर्व्हे करून आणि पुरावे गोळा करून अहवाल सकारात्मक देणे गरजेचे आहे, असे झाले तरच समाजास आरक्षण मिळेल. मात्र, असे न करता सरकारने घेतलेला हे विशेष मागासवर्गीय आयोगाचा निर्णय हा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत समाजास वेड्यात काढण्याचे असल्याचे विनायक मेटे म्हणाले. तसेच आता या सरकार आणि निर्णयाविरुद्ध विधीमंडळात विषय मांडणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मेटे यांनी दिला आहे.
समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला शिवसंग्रामचे समर्थन- मेटे
आजपासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. तर या उपोषणास समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे. याबाबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना विचारले असता त्यांनी, गेल्या अनेक वर्षापासून शिवसंग्राम देखील समाजासाठी काम करत आहे. आमच्यासारखे अनेकजण समाजासाठी काम करतात. मात्र, आज असो किंवा भविष्यात समाजासाठी जे जे काम करतील त्या सर्वांसाठी आमचा पाठिंबा असेल, असे म्हणत त्यांनी संभाजीराजेंचे नाव न घेता पाठिंबा दिला आहे.