कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता. या निर्णयाची थेट सरकारनेसुद्धा दखल घेत याबाबतचा निर्णय राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले होते. यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी यासंदर्भातले निर्णय जाहीर केले आहेत. आता या विधवा प्रथा बंदी निर्णयाच्याही पुढे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी 11 हजारांचे अनुदानच जाहीर (Grant to Widows for Remarriage) केले आहे. अशा पुनर्विवाहासाठी अनुदान जाहीर करणाऱ्या या देशातील पहिल्या ग्रामपंचायती ठरल्या आहेत.
या दोन ग्रामपंचायतींचा निर्णय - शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी ग्रामपंचायत ((Takali Vadi Gram Panchayat) आणि राधानगरी ग्रामपंचायत (Radhanagari Gram Panchayat) या दोन्ही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करून यावरच न थांबता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा महिलांना अमेक कार्यक्रमांमध्ये हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करून कृतीद्वारे सन्मान दिला आहे. शिवाय अनेक महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी अनुक्रमे टाकळी वाडी ग्रामपंचायतने 10 हजार आणि राधानगरी ग्रामपंचायतने 11 हजारांचे अनुदान जाहीर केले आहे. टाकळीवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच बाजीराव गोरे यांच्यासह सरपंच तसेच सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर राधानगरी गावच्या लोकनियुक्त सरपंच कविता शेट्टी यांच्यासह उपसरपंच तसेच सदस्य, गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाप्रसंगी विधवा महिलांचे पूजन : दरम्यान, शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील एका मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाप्रसंगी विधवा महिलांचे सुवासिनी म्हणून पूजन करून विधवा प्रथेला मूठमाती देण्यात आली. यामुळे समाजात विधवांना आता कृतीतून सन्मान मिळत असल्याचेही पहायला मिळत आहे. येथील मंदिरात देवीच्या पूजेनंतर सुवासिनी पूजन केले. यामध्ये सुवासिनींसोबत विधवा महिला चंद्राबाई निर्मळे, रेश्मा निर्मळे, सरिता निर्मळे आणि शोभा निर्मळे यांचे पाय पूजन करून, फुले वाहून त्यांना कुंकू- हळद लावून त्यांची नारळाने ओटी भरत सन्मान केला.
राधानगरी ग्रामपंचायतीच्यावतीने विधान प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे जाऊन विधवा महिलांनी पुनर्विवाह केला तर त्यांना 11 हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी यांनी दिली आहे.
29 ग्रामपंचायतींनी विधवा परंपरेविरोधात एकाच दिवशी घेतला ठराव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी एकाच दिवशी विधवा प्रथा बंदचा ठराव मंजूर केला आहे. अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ आहे जो १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरला.
सोनगाव ग्रामपंचायतीकडून महिला समान सन्मान समिती स्थापन : विधवा प्रथा बंदीच्या निर्णयासोबतच सोनगाव ग्रामपंचायतीने महिला सन्मान समिती स्थापन केली आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून हा निर्णय झाला आहे. या समितीमध्ये गावातील 10 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील सोनगावच्या या निर्णयाला ग्रामपंचायतींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जकातवाडी, हेरवाडच्या निर्णयाचे राज्यभर अनुकरण : सातार्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा प्रथा बंद केली होती. मात्र, त्याची फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली. ग्रामपंचायत स्तरावर या निर्णयाला मोठा प्रतिसाद मिळाला. हेरवाड पाठोपाठ अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा रद्द करण्याचे ठराव मंजूर केले. या निर्णयाने या महिलांना समाजात मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचयातीने देखील विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. महिलांना समान्माची वागणूक मिळावी म्हणून महिला सन्मान समिती स्थापन करण्यात आली. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचा निर्णयही घेतला आहे.
माजी सैनिकाकडून विधवांच्या पुनर्विवाहासाठी 1 लाखाची मदत : विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाला माजी सैनिक गोविंदराव आनंदराव नावडकर यांनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. सोनगावातील 10 विधवांच्या पुनर्विवाहासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. प्रत्येक लग्नासाठी दहा हजार रुपये मदत ते देणार आहेत. या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता पहिला निर्णय : कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ( Herwad Gram Panchayat ) ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विधवा महिलांना सन्मान मिळवून देणारा विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. ही कोल्हापुरातील पहिली ग्रामपंचायत होती.
विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याची ( Stop Widow Tradition ) मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असा शासन आदेश परिपत्रकाद्वारे जारी केला आहे.
हेही वाचा - Stop Widow Tradition : महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल, विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक