कोल्हापूर - ऊसाला पाणी लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तुटलेल्या वीज तारेचा स्पर्श होवून जागीच मृत्यू झाला. पोपट रघुनाथ पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे आज पहाटे घडली.
हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे शेतकरी पोपट रघुनाथ पाटील (वय 58) यांची गट नंबर 305मध्ये दीड एकर शेती आहे. सोमवारी रात्री ते ऊस पिकाला पाणी लावून राञी घरी आले होते. पोपट पाटील पहाटे साडेचारच्या सूमारास शेताकडे पुन्हा गेले होते. त्यांच्या शेतातून 11 हजार होल्ट आणि 440 होल्ट अशा दोन प्रकारच्या तारा गेल्या आहेत. 11 हजार होल्टची तार तुटून 440 होल्टच्या प्रवाहीत तारेवर पडून शेतात लोंबकळत होती. तार तुटल्यानंतर डीपी तील फ्यूज उडून प्रवाह बंद होणे गरजेचे असतानाही फ्यूज व त्यातील तार हेवी असल्याने ती खंडित झाली नाही. त्यातुन विद्युत प्रवाह सुरूच होता. दरम्यान ऊसाचे पाणी पाहण्यास गेलेल्या पोपट पाटील यांचा स्पर्श या प्रवाहित तुटलेल्या तारेला झाल्याने ते त्यांचा जागीच मृत्यू झाला. उशीर झाला तरी घरी न परतल्याने कुटुंबातील व्यक्तीनी शेताकडे धाव घेतल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. ही माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोपट पाटील हे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.