कोल्हापूर - सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेल्यानंतर एका प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाच्या घरात चोरांनी डल्ला मारला आहे. कोल्हापुरातल्या आपटेनगर परिसरात ही घटना घडली असून चोरट्यांनी तब्बल 52 हजार रोख रक्कमेसह 12 तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. प्रवीण बाळकृष्ण रणदिवे (वय 50, रा. महालक्ष्मी कॉलनी, राधानगरी रोड, आपटे नगर कोल्हापूर) असे फिर्यादीचे नाव आहे.
दरवाजाची कडी, कोयंडा तोडून चोर घुसले बंगल्यात
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाळकृष्ण रणदिवे यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे रविवारी रात्री सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह जिवबा नाना पार्क येथील सासऱ्यांच्या घरी बंगल्याला कुलूप लावून गेले होते. सासऱ्यांचा अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर आणि नातलगांचे सांत्वन करून प्रवीण रणदिवे सोमवारी सकाळी आपल्या आपटेनगर मधील घरी परत आले. परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाची कडी, कोयंडा तुटल्याचे दिसून आले. त्यांना लगेचच घरात चोरी झाल्याची शंका आल्यानंतर तत्काळ घरात जाऊन पाहणी केली असता घरातल्या हॉलमध्ये ठेवलेल्या पाकिटामध्ये 52 हजार रुपये, तसेच बेडरूममधील लोखंडी तिजोरीमधील बारा तोळ्याचे दागिने लंपास झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
साडेसहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरी
दिलेल्या फिर्यादीनुसार, दागिन्यांमध्ये चार तोळे गंठण, पाच तोळ्यांच्या बांगड्या, एक तोळे वजनाची चेन, दोन तोळे वजनाच्या तीन अंगठ्या असे एकूण बारा तोळे वजनाचे दागिने आणि रोख 52 हजार रुपये असा साडेसहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून रणदिवे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.