कोल्हापूर : मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज 17 जून रोजी सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत मराठा समाजातील प्रमुख समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांवर काय निर्णय होतो? हे पाहावे लागणार आहे.
मूक आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चर्चेसाठी बोलावली बैठक
काल (बुधवारी) मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक परिसरात मूक आंदोलन झाले होते. यामध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी आपली भूमिका मांडून आरक्षणाबाबत आणि आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांबाबत आपण काय पाठपुरावा करणार आहात हे स्पष्ट करावे असे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील नेत्यांनी आपापली भूमिका मांडली. शिवाय जिल्ह्यातील तीनही नेत्यांनी उद्याच मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊ आणि याबाबत सविस्तर चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले होते. त्यानुसार आज संभाजीराजे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजातील समन्वयकांसोबत बैठक होणार आहे.
हेही वाचा - 'आरक्षणतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे केल्याशिवाय राहणार नाही'