कोल्हापूर/हैदराबाद : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी माजी खा. राजू शेट्टी यांनी भेट घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनासह देशातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली.
भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण
राजू शेट्टी आणि चंद्राबाबू नायडूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीमागील नेमके कारण कळू शकले नसले तरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर उभय नेत्यांदरम्यान यावेळी चर्चा झाल्याचे समजते आहे. २०१८ मध्ये खा. राजू शेट्टी यांनी संसदेत सादर केलेल्या संपूर्ण कर्जमाफी विधेयक, तसेच उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट हमीभाव विधेयकाला तेलुगू देसमने पाठिंबा दिला होता हे येथे उल्लेखनीय.
भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी नायडूंचा पुढाकार
केंद्रातील भाजप सरकार विरोधात देशभरातील राजकीय पक्षांची मोट बांधण्यासाठी चंद्राबाबू नायडूंनी पुढाकार घेतला होता. देशातील विविध राज्यांतील भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी देशभरातील नेत्यांची चंद्राबाबू नायडूंनी भेट घेतली होती. त्यामुळेही या भेटीचे वेगवेगळे अन्वयार्थ आता लावले जात आहेत.
हेही वाचा - फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार