कोल्हापूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरफीमधून वीज बिले वसूल करा, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. त्या आदेशावरून राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांवर टीकास्त्र सोडले आहे. कोणत्या कायद्यानुसार ही वसुली करण्याचे आदेश दिलेत, हे साखर आयुक्तांनी स्पष्ट करावे. हा आदेश केवळ सरकारच्या दबावामुळे काढला असून, जर हा आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल ऊस एफआरफीमधून वसूल करावे, असे आदेश राज्यातील साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना दिले आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. साखर आयुक्तांच्या या आदेशावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडले. राज्यातील साखर आयुक्तांनी महावितरणचे थकीत बिल वसूल करण्याचे आदेश कोणत्या अधिकारात दिले, असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
1966च्या ऊस दर नियंत्रण कायद्याचा हवाला
1966च्या ऊस दर नियंत्रण कायद्याच्या तरतुदीत शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून कोणतेही पैसे वजा केले जाऊ नयेत, असा कायदा असताना साखर आयुक्तांनी हा आदेश का दिला हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले आहेत. हे आदेश रद्द करावेत अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.