कोल्हापूर - महावितरण शेतकऱ्यांना रात्री वीज देत असल्याने शेतकऱ्यांना विजेचा शॅाक लागून तसेच, वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्याच्या पत्नीचे मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी महावितरण अधिकाऱ्याकडे मंगळसूत्र तसेच, हिरव्या बांगड्या देत रक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा - Marathi Bhasha Divas Kolhapur : कोल्हापूरचा 'आबा' जगभरात पोहोचवतोय कोल्हापुरी रांगडी भाषा
शेट्टी यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित
कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शेती पंपास दिवसा वीज द्या, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसूत्र, कूंकू व बांगड्या देऊन रक्षण करा, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी बोलताना जि.प. सदस्या पद्माराणी पाटील म्हणाल्या की, शेतकऱ्याला रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी पाजविण्यासाठी जावे लागत आहे. शिवाय दररोज विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. शिवाय घरातील प्रमुख जबाबदार व्यक्तीला दररोज पाणी पाजण्यासाठी शिवारात गेल्यानंतर वन्यप्रण्यांपासून जीवितास धोका असतो. आजपर्यंत राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा यामध्ये जीव गेला आहे. यामुळे राज्यातील संपूर्ण महिला शेतकऱ्यांच्यावतीने आपण आमच्या या भावना सरकारला पोहचवून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या माता भगिनीचे विधवा होण्यापासून रक्षण करावे. याकरिता आज आम्ही आणलेले हे मंगळसूत्र, कुंकू व बांगड्या सरकारकडे पाठवून आमच्या भावना कळविण्यात याव्यात, अशी मागणी या महिला आघाडीकडून करण्यात आली.
यावेळी संगीता शेट्टी, जि.प. सदस्या शुभांगी शिंदे, परितेच्या मा. पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील, सन्मती पाटील, सुवर्णा पाटील, यांच्यासह निमशिरगाव, जयसिंगपूर, परिते, शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.