कोल्हापूर - राज्यभरातील दूरचित्रवाणी व चित्रपटांचे चित्रीकरण तत्काळ थांबवण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. सेटवर सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय नुकताच जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे शूटिंग तात्काळ थांबवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
सातारा येथे 'काळुबाईच्या नावान चांगभल' या दूरचित्रवाणी मालिकेच्या सेटवर अनेक कलाकार व तंत्रज्ञांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्देवाने त्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. देशभरात लॉकडाऊन उठल्यानंतर चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण कोल्हापूर आणि परिसरात होऊ नये, अशी आम्ही मागणी केली होती. त्यावेळी अनेकांनी कलाकार तंत्रज्ञांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याचे भावनिक आवाहन केले होते. त्यामुळे प्रशासनाने चित्रीकरणास परवानगी दिली. मात्र, कोरोनाचा वाढता फैलाव आणि सोशल डिस्टंसिंग न पाळल्यामुळे कोल्हापूर परिसरातील चालू असलेल्या चित्रिकारणामधील बहुसंख्य तंत्रज्ञ व कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता आशाताईंच्या दुर्दैवी निधनाने चित्रीकरणाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे चित्रीकरण तत्काळ थांबवण्याची मागणी महेश जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.