कोल्हापूर - पूरबाधित नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडे गावापासून करुया, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. इचलकरंजीतील पूरपरिस्थिची पाहणी केल्यानंतर हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार, खोची, भेंडवडे या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता
शासनाच्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नागरिकांच्या नावांची यादी तयार करा -
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भेंडवडे गावाला दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत सरपंच, गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना आवाहन केले. यावर, पूर परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यादृष्टीने सुरक्षित असणाऱ्या शासनाच्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नागरिकांच्या नावांची यादी तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडेपासून करुयात. शिवाय येथील इच्छुक नागरिकांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करु, असे सांगून येथील नागरिकांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकेल का, याबाबतही त्यांनी चर्चा केली. यावेळी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
हेही वाचा - महाराष्ट्रात झिकाचा आढळला पहिला रुग्ण, पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला लागण