कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज 147 वी जयंती कोल्हापूर आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साधेपणाने ही जयंती साजरी केली जात असली तरी दरवर्षी कोल्हापुरात अगदी जल्लोषात जयंती साजरी केली जात असते. विविध संस्था, संघटनांच्या वतीने व्याखानं, अभिवादन आदी कार्यक्रमांनी आज शाहूंची जयंती साजरी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजर्षी शाहूंच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा देणारा हा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट..
यशवंतराव घाटगे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज..
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलमधील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या आई आनंदीबाई यांनी घाटगे घरण्यातून यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले. 17 मार्च 1884 साली त्यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू ठेवले. पुढच्या दहा वर्षांनी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला आणि 1922 पर्यंत 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. याच दरम्यान त्यांनी कोल्हापूर संस्थानासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. खरंतर ब्रिटिशांच्या काळातही आपल्या राज्यातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्त केले. शिवाय बहुजन समाजाच्या उन्नतीसाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले होते.
आरक्षणाचे जनक..
समाजात मागासलेल्या लोकांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी अनेक प्रयत्न केले. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मात्र, शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना आरक्षण दिले पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून मागास जातींना आरक्षण दिले. त्यासाठी त्यांनी अनेकांचा विरोध झाला मात्र आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. बहुजन समाजातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करत खऱ्या अर्थाने ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यामुळेच त्यांच्याकडे आरक्षणाचे जनक म्हणून सुद्धा पाहिले जाते.
मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांना दंड केला..
सर्वांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक प्रयत्न केले. शिक्षणाबद्दल त्यांच्या असलेल्या आस्थेची अनेक उदाहरणे आहेत. मोफत सक्तीचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढून अनेक शाळा काढल्या. शिवाय मुली सुद्धा शिकल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. एवढेच नाही तर, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी थेट पालकांनाही दंड केला होता. त्यामुळे पालक सुद्धा मुलींना शाळेमध्ये पाठवू लागले. यावरूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शिक्षणाबद्दल असलेली जागृकता संपूर्ण जगाने पाहिली होती.
राधानगरी धरणाची निर्मिती करून जिल्ह्याची तहान भागवली..
दूरदृष्टी काय असते हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले. सिंचनाचे महत्व आणि जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ओळखून त्यांनी तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूरातील भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. आजही हे धरण भक्कमपणे उभे असून पाण्याचा एक थेंब देखील गळत नाही. देशातील एकही असे धरण नाही, ज्या ठिकाणी स्वयंचलित दरवाजे आहेत. मात्र, राधानगरी धरण हे असे एक धरण आहे ज्यामध्ये जेव्हा शंभर टक्के पाणीसाठा होतो तेव्हा त्याचे सात दरवाजे आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. आज अशा पद्धतीचे तंत्र कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजही देशासह जगभरात या धरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते.
प्लेगची साथ आणि उपायोजना..
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर येऊन कारभार हातात घेताच काही वर्षातच प्लेगची साथ आली. ही साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यांनी विविध उपाययोजना करायला सुरुवात केली. सद्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अनेकांचा बळी गेला आहे. यापेक्षाही भयानक अशा प्लेग वर 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी विविध उपाययोजना केल्या आणि आपल्या संस्थानातील नागरिकांना कसे यापासून सुरक्षित ठेवता येईल याकडे लक्ष दिले. आता जरी मोबाईल आणि टीव्हीमुळे कोरोनाबाबत जनजागृती करणे सोपे असले तरी त्याकाळी शाहू महाराजांनी प्रत्येकाच्या घरी प्लेक कशामुळे होतो, आणि आपण काय काळजी घ्यायला हवी हे माहितीपत्रकाद्वारे पोहोचवले. त्यांनी त्यानंतर अनेक ठिकाणी प्लेग प्रतिबंधक हॉस्पिटल सुरू केली. खरतर प्लेगग्रस्त रुग्णांना अलगीकरणात राहावे लागायचे. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी अलगीकरण केंद्र तपासणी केंद्र सुरू केली. एव्हढेच नाही तर ज्यांच्या घरामध्ये प्लेगची लागण झाली आहे अशा घरांचे निर्जंतुकीकरणही केले जायचे. या सर्व संकटाला सामोरे जाताना आपल्या राज्यातील कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही याचीही त्यांनी विशेष काळजी घेतली होती. त्यामुळेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या उपायोजना केले त्या आजही संपूर्ण देशभराला आदर्शवत अशाच आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य अफाट आहे त्यामुळेच त्यांच्याप्रती असलेली जनतेची आस्था, श्रद्धा आजही कायम आहे.