कोल्हापूर - ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपाच्या आमदारांनी घातलेल्या गदारोळावरून कोल्हापुरात शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. उठसूठ ठाकरे कुटुंबावर आरोप खपवून घेणार नाही. काल जो विधान भवनात प्रकार घडला त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य धोक्यात आले. सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपाचे हे कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे, असे म्हणत आज जर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असते तर त्यांनी या 12 आमदारांच्या थोबाडीत हाणली असती, असे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी दसरा चौक येथे हे आंदोलन केले.
'सत्तेत असताना चंद्रकांत पाटलांनी काय केले, याचे चिंतन करावे'
पवार पुढे म्हणाले, की नेहमी ठाकरे सरकारवर आरोप करण्यापेक्षा सत्तेत असताना तुम्ही काय केले याचे चंद्रकांत पाटलांनी चिंतन करावे. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. कालच्या कृतीमुळे देशभरात महाराष्ट्राची नाचक्की झाली, त्यामुळे यांना जनता माफ करणार नाही. खरेतर मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या हातात आहे. शिवाय सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा धोकाही कायम आहे. अशा वेळी भाजपाच्या नेत्यांनी गल्लीत गोंधळ न घालता दिल्लीत घालायला हवा होता, असेही संजय पवार यांनी म्हटले आहे.
'सत्तेपासून बाजूला गेल्याने सर्व हैराण'
वास्तविक भाजपा सत्तेपासून लांब गेल्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे नेहमीच सरकारवर आरोप करत सुटत असतात. खरेतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, असे असताना त्यांना विनाकारण बदनाम केले जात आहे. हे सर्व जनतेलाही माहीत आहे. त्यामुळे यापुढे आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशाराही यावेळी शिवसेनकडून देण्यात आला.