कोल्हापूर - कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर मद्यपान करत पार्टीच्या तयारीत असलेल्या मद्यपीला शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला आहे. एका बकरीसह काहीजण रांगणा किल्ल्यावर पार्टी करण्यासाठी आले होते. याची माहिती शिवभक्तांना मिळताच त्यांनी पार्टी करणाऱ्यांना धारेवर धरले. तसेच एका मद्यपान केलेल्या तरुणाला चोप देत माफी मागायला लावली.
हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद करण्यात आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पार्टी करण्यासाठी आलेले पर्यटक नेमके कुठले आहेत, हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
यापूर्वी सुद्धा जिल्ह्यातील काही किल्ल्यांवर असे प्रकार समोर -
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत. त्यामुळे यापूर्वी सुद्धा अनेकवेळा याठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्या-त्या वेळी तेथील स्थानिक शिवप्रेमींनी अशा मद्यपींना चोप देत माफी मागण्यास भाग पाडले आहे. आता रांगणा किल्ल्यावर सुद्धा हा प्रकार घडल्याने तेथील स्थानिकांनी मद्यपीला चोप दिला आहे. शिवाय डोकं टेकवून माफी मागायला लावली.
गडकिल्ल्यांवरील पार्टी कधी थांबणार-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. हाच आदर्श सर्वजण डोळ्यासमोर ठेवतात. मात्र दुसरीकडे अशा प्रकारच्या काही लोकांमुळे चुकीची पद्धत सुरू होते. अशा व्यक्तींना वेळीच धडा शिकवला पाहिजे, असे शिवभक्तांना नेहमीच वाटते. त्यामुळे गडकिल्ल्यांवर पार्टी कधी थांबणार, असा सवाल शिवभक्त विचारत आहेत.
हेही वाचा- केंद्राच्या अर्थसंकल्पाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम - अर्थमंत्री अजित पवार
हेही वाचा- गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या नामांतरणावरून श्रीहरी अणे यांची शिवसेनेवर बोचरी टीका