कोल्हापूर - कोल्हापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जंगलातून आलेल्या गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा बळी जात काही जण जखमीही झाले होते. वन विभागाने खबरदारी घेत उपाययोजना करत गव्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे अपेक्षित होते. परंतु अद्याप हा गवा शहरात विविध ठिकाणी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला वन विभागाचा निष्काळजीपणा दिसत आहे. म्हणून आज कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने ( Kolhapur Shiv Sena ) वनअधिकारी आर आर काळे ( Forest Officer R R Kale ) यांना चंगलेच धारेवर धरण्यात ( Shiv Sena Aggressive Against Forest Officials ) आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार ( Shiv Sena District President Sanjay Pawar ) व वनाधिकारी काळे यांच्यात शाब्दिक वाद देखील झाला.
जबाबदारी झटकुन चालणार नाही
यावेळी पवार म्हणाले, शासनाकडून मदत देऊन वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जंगली हत्ती, गवे, बिवटे इत्यादी जनावरे नागरी वस्तीमध्ये येण्याच्या घटना व त्यापासून झालेले नुकसान हे पहिल्यांदाच घडलेले नाही. वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये येवून प्रवचन व सल्ला देण्यापेक्षा इथे असलेल्या त्रुटी दूर केल्या असत्या तर योग्य झाले असते. आपल्या खात्यातील तज्ञ अधिकारी व कर्मचारी झोपा काढत आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. गलेलठ्ठ पगार, सर्व सुविधा ह्या अधिकाऱ्यांना सरकार देत आहे. त्या बदल्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी वन्य प्राण्यांसंदर्भात जनजागृती केली आहे? असा सवाल देखील संजय पवार यांनी उपस्थित केला. कोल्हापुरातील वन खात्याकडे ट्रॅक्युलिझर गन, योग्य ड्रग्ज आणि प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे का? वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये कोणी जखमी झाले, मयत झाले किंवा शेतीचे नुकसान झाले एवढेच काम वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नसून हे सर्व होणार नाही ही दक्षता घेण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आवश्यक तो स्टाफ कायमस्वरूपी सर्व सुविधांसह २४ तास तयार ठेवण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने वन अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळे ठोकू, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाच्या घरातील एकास सरकारी सेवेत घ्या
गेल्या काही दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडीतील तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सौरभ संभाजी खोत (वय 24) असे या तरुणाचे नाव होते. तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले होते. हे केवळ वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मृत्यू झालेल्या तरुणाच्या घरच्यांना 50 लाख रुपये मदत देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.