कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज संपन्न होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे आजचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापुरातील जिल्हा परिषद येथे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hassan Mushrif) व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून व भगव्या ध्वजाचे पूजन करून स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
स्वराज्य दिनाला मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आमदार जयंत आजगावकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे व नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. गेल्या वर्षीपासून राज्यातील 34 हजार ग्रामपंचायती, 525 पंचायत समिती व 34 जिल्हा परिषदेमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरातील जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
हसन मुश्रीफ यांनी मांडले मनोगत : यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला होतो. तो राज्यभर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होतोय. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ग्रामविकास विभागाच्या आदेशाप्रमाणे आपण राज्यातील 34 हजार ग्रामपंचायती, 532 पेक्षा जास्त पंचायत समित्या आणि 34 जिल्हा परिषदांमध्ये यंदा भगवी गुढी उभी करून कोल्हापुरात हा दिवस आपण मोठ्या उत्साहात शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या जत्साहात साजरा करीत आहोत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण करण्याचा आज दिवस असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उतरली शिवसृष्टी : जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसच्या प्रांगणात आज जणू शिवशाहीच अवतरली होती. शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे भगवी गुढी उभी करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यात आला. यावेळी कलाकारांनी शिवकालीन मर्दानी खेळ सादर केले. तसेच, छत्रपतींचं कार्य शाहिरी पोवाडेंच्या माध्यमातून सांगण्यात आले, तर अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या वेशात या ठिकाणी दाखल झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठी शोभा निर्माण झाली होती.