कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. समाजाची सेवा करण्यास संधी मिळू दे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्यास बळ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज मेन राजाराम हायस्कूल येथे दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे ते आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते देवीला साडीचोळी वाहण्यात आली. त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रितिरिवाज प्रमाणे मी आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. समाजाची सेवा करण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मला ताकद मिळावी, असे साकडे श्री करवीर निवासिनी अंबाबाईला घातले असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या प्रमाणे एक टक्का काम करण्याची संधी मिळाली तर माझे जीवन सार्थक झाल्याचे समाधान मला मिळेल, असेही यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विनायक फाळके, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, धनाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.