कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांची पुण्याई माझ्या पाठीशी आहे. ज्या रायगडाने मला मोठे केले त्या रायगडच्या साक्षीने मी माझ्या खासदारकीची पहिली पहाट सुरू केली. ज्या शाळेने मला घडवले त्या शाळेच्या साक्षीने या कार्यकाळाची सायंकाळ व्यतीत केली. तर, उद्याच्या नव्या सूर्योदयासोबत तेजाळण्याची उर्मी घेऊन येथून बाहेर पडलो, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती ( sambhaji raje chhatrapati ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
3 मे रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, संभाजीराजे आता पुढची भूमिका काय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
काय म्हणाले फेसबुक पोस्टमध्ये - जून 2016 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली. तेव्हा पहिल्याच दिवशी दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळास अभिवादन करून मी माझ्या खासदारकीची सुरूवात केली होती. 3 मे 2022 रोजी माझा या खासदारकीचा कार्यकाळ समाप्त झाला. हा दिवस मी राजकुमार कॉलेज, राजकोट येथे ( Rajkumar College Rajkot In Gujrat ) व्यतीत केला, असे संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
"राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे शिक्षण ..." - गुजरातमधील राजकोट येथे असणाऱ्या सुमारे 150 वर्षे जुन्या ऐतिहासिक राजकुमार कॉलेज मध्येच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे शिक्षण झाले होते. महाराजांचे वडील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज देखील काही काळ या शाळेत शिकले होते. 1978 ते 1983 या काळात माझे शिक्षण याच शाळेमध्ये झाले. या शाळेशी माझ्या बालपणातील अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कॉलेज मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मला निमंत्रित केले होते. यावेळी उपस्थित राहून महाराजांच्या या शाळेत महाराजांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली वाहिली. यानिमित्ताने जवळपास 40 वर्षांनंतर मी माझ्या शाळेला पुन्हा भेट दिली. यावेळी बालपणातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर फिरून बालपण पुन्हा जगलो, असेही संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.