कोल्हापुर - शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला शिवरायांच्या मुर्त्या, पुतळे बनविणारे पाहायला मिळतात. अनेक छोट्या मोठ्या मंडळातील शिवरायांच्या मूर्ती त्यांच्याकडच्याच असतात. एव्हढेच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्येसुद्धा आता यांच्याकडच्याच शिवरायांच्या मूर्ती पाहायला मिळतात. आज त्याच विक्रेत्यांचा कोल्हापुरातील संभाजी ब्रिगेडने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. शिवाय त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना नवीन कपडेसुद्धा भेट दिली.
यांचा सन्मानसुद्धा महत्वाचाच -
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती पुतळे व प्रतिमांची मागणी असते. स्थानिक कलाकार महापुरुषांच्या स्मृति ठेवणाऱ्या मूर्ती, पुतळे कमी प्रमाणावर तयार करतात. पण रस्त्याकडेला विक्री व निर्मिती करणारे लोक स्वतः अतिशय गरिबीत राहतात पण छत्रपती शिवरायांच्या मूर्ती अल्प किमतीत तयार करून विकतात. यामुळे शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांमध्ये जयंतीनिमित्त या मूर्ती सर्वांना उपलब्ध होतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सर्वांचाच सत्कार करण्यात आला.
भेट स्वरूपात दिले नवीन कपडे :
यावेळी शिवजयंती हा आमच्यासाठी दिवाळी सण आहे म्हणत संभाजी ब्रिगेडच्या वतीने या शिवरायांच्या विविध आकारातील आकर्षक मुर्त्या बनविणाऱ्या सर्वच कारागिर, विक्रेत्यांसह त्यांच्या परिवाराला नवीन कपडे भेट दिली. पहिल्यांदाच अशी कोणाकडून तरी भेट मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे एडवोकेट पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजीत भोसले, निलेश सुतार, शाहिर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुजय देसाई, शर्वरी मानगावे, मदन परीट बबलू ठोंबरे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.