कोल्हापूर - सौंदत्ती येथील रेणुका मंदिर भाविकांसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी डी. सी. हिरेमठ यांनी हे आदेश काढले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी आता प्रत्येक वाहनधारकांची तपासणी सुद्धा केली जात आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
सौंदत्ती येथील रेणुका मंदिर भाविकांसाठी पुन्हा एकदा बंद सौंदतीला लाखो भाविक जातात दर्शनाला-सौंदती येथील रेणुका देवीचे लाखो भाविक आहेत. देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक जात असतात. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे 8 ते 9 महिने मंदिर बंद होती. त्यात आता पुन्हा एकदा सौंदती मधील रेणुका मंदिर बंद करण्यात आले असल्याने भविकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
कोगनोळी टोल नाका येथे कोरोना तपासणी-
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाक्यावर प्रशासनाकडून चेक पोस्ट सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांमधील प्रवाशांची तपासणी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे याबाबतचे कोणतेही आदेश नसताना चेकिंग सुरू आहे. त्यातच आता सौंदती येथील रेणुका मंदिर सुद्धा दर्शनासाठी बंद करण्याचा बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज - मुख्यमंत्री