कोल्हापूर - शहरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकातील दगडी तटबंदीवर ऑईल पेंट लावून त्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांना रोखण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना तो रंगही काढायला लावला आहे. बुरुजावर रंग लावून जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच कोल्हापुरातील युवा सेनेचे हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक आदिल फरास आदींनी त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना रंग काढायला भाग पाडले.
कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बिंदू चौक परिसरातच पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. त्यामुळे परिसरात शांतता पसरली आहे. याचाच फायदा घेत काही जाहिरात कंपन्यांनी कोणाचीही परवानगी न घेता बुरुजांची आतील आणि बाहेरील तटबंदीची भिंत रंगवल्याची संतापजनक घटना समोर आली.
स्थानिक नागरिकांनी सुद्धा त्यांना तत्काळ याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांना कोरोनाबाबत जनजागृतीची जाहिरात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐतिहासिक बुरुजावर अशा प्रकारे ऑइलपेंट लावण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली, असा सवाल करत नागरिकांनी याबाबत युवा सेनेचे हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक आदिल फरास, मनजीत माने आदींना माहिती दिली. त्यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन संबंधितांना फैलावर घेत तो संपूर्ण रंग पुसून काढण्यास भाग पाडले.