कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. गेल्या ४८ तासांत २८७ वाहने जप्त करून नियमांचा भंग करणाऱ्यांकडून साडे सहा लाखांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांंपासून पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्त बजावत आहे.
कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नाकाबंदीसह गस्तीपथकाद्वारे कारवाई सुरू केली. शहरातील जुना वाशीनाका, दसरा चौक, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, दसरा चौक, दाभोळकर कॉर्नर, अशा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली.
अशी झाली दंडात्मक कारवाई-
विना मास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. नियमांचा भंग करणाऱ्यांकडून गेल्या ४८ तासात तब्बल ६ लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल केला. २८ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या ४११ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख १२ हजार इतका दंड वसूल केला. तर १४६ वाहने जप्त करून १ हजार ३८७ वाहनधारकांकडून नियम भंग केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला. यांच्याकडून ३ लाख ७ हजार ४०० इतका दंड वसूल केला.
तर २९ एप्रिल रोजी विना मास्क फिरणाऱ्या ३८३ जणांवर कारवाई करण्यात आली. १४१ वाहने जप्त करण्यात आली. तर १ हजार ७४२ जणांवर नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ६० हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला.