कोल्हापूर - महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती केल्याचे नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले. रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्री म्हणून आणल्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपद रिकामे झाले होते. चंद्रकांत दादा पाटील यांची पक्ष संघटनेतील ज्येष्ठता आणि संघटनात्मक अनुभव पाहता निवडणूक वर्षात त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा होती, ती खरी ठरली.
केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने मला खूप आनंद झाला आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी आपण निश्चितपणे चांगल्या रीतीने पार पाडू असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवाय कार्यकर्त्यांना सुद्धा विधानसभेच्या कामाला लागा, असे आदेश सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.