कोल्हापूर - महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शहरातील प्लास्टिक कचरा गोळा करताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस प्लास्टिकची एक मोठी समस्या निर्माण होत आहे. असे असताना कोल्हापूरमधील गांधीनगर बाजारपेठ येथे खुलेआम प्लास्टिक विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित दुकानातील जवळपास दीड ते दोन टन प्लास्टिक जप्त केला आहे. संभाजी ब्रिगेडचे निलेश सुतार यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर रविवारी ही कारवाई करण्यात आली. या जप्त केलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत 8 ते 10 लाख रुपये इतकी आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil on MLC Election : विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू - चंद्रकांत पाटील
संभाजी ब्रिगेडची तक्रार आणि महापालिका ॲक्शन मोडमध्ये - दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निलेश सुतार यांना कोल्हापुरातील गांधीनगर बाजारपेठेत बेकायदेशीर असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कप, ग्लास आदी वस्तूंची होलसेल तसेच किरकोळ विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. येथील व्यापारी अशोक आहुजा यांच्या बाबाजी ट्रेडर्समध्ये या बेकायदेशीर प्लॅस्टिकची विक्री होत असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ याबाबत संबंधित दुकानात जाऊन व्यापाऱ्याकडे जाब विचारला, तसेच एकीकडे प्लॅस्टिकवर बंदी असताना आपण कशी विक्री करता याबाबत विचारणा केली. तसेच पोलीस आणि महापालिकेला याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलीस तसेच महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता दुकानात तसेच दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टील आढळेल. तपासणी केली असता हे कमी मायक्रोनचे असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी तात्काळ या गोडाऊनमधील प्लास्टिक जप्त केले. याचे वजन अंदाजे दीड ते दोन टन इतके होते.
..तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही - एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा असलेले प्लास्टिक केवळ एकाच दुकानात आढळले. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आदींची विक्री होत आहे. हे तात्काळ थांबले पाहिजे शिवाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्ते निलेश सुतार यांनी केली. कारवाई न झाल्यास यापुढे संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला.
हेही वाचा - Rajya Sabha elections 2022 : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजयी होणार- राहुल चिकोडे