कोल्हापूर - दिवसभर सायकलवरून फिरून बाजारात चहा विकणाऱ्या कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील तेरवाडमधील सुनील कमलाकर यांच्या मुलीने आशियाई युथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक ( Nikita Silver medal in Asian Youth and Junior Weightlifting Championship ) मिळवत संपूर्ण जिल्ह्याचे नाव देशात गाजवले आहे. निकिता कमलाकर, असे तिचे नाव असून तिच्या या कामगिरीनंतर संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे निकताचे वडील सुनील कमलाकर हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. तरीही ते मोठ्या हिंम्मतीने संसाराचा गाडा चालविण्यासाठी चहाचा गाडा चालवतात. मात्र आपल्या मुलीने गगनभरारी घेत संपूर्ण जगभरात नाव करावे, असे त्यांचे स्वप्न आहे आणि आता त्यांचे हे स्वप्न हळूहळू पूर्ण होत असताना पाहून खूप आनंद होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य : नुकत्याच उझबेकीस्तानमध्ये पार पडलेल्या आशियाई युथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातल्या तेरवाडमधील निकिता सुनील कमलाकरने रौप्य पदक पटकावले. 55 किलो वजनी गटातून तिने स्नॅच प्रकारात 68 किलो तर क्लिन अँड जर्क प्रकारात 95 किलो असे एकूण 163 किलो वजन उचलून तिने रौप्यपदक पटकावले. तर क्लिन अँड जर्कमध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे कोल्हापुरातील क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. खरतर निकिताचा आजपर्यंतचा प्रवास हा खडतर असाच राहिला आहे. पाचवीत शिकत असल्यापासून ती सराव करत आहे. तिचे प्रशिक्षक विजय माळी यांनी तिच्यातील खेळाबाबत असलेली आवड ओळखूनच त्यांनी यामध्ये प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला होता. मात्र त्यामध्ये तिला थोडक्यात पराभव पत्करावा लागला. मात्र आता केलेल्या या कामगिरीमुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वडील सुनील कमलाकर आणि कुटुंबाची मुलींसाठी धडपड : निकिताचे वडील सुनील कमलाकर हे त्यांचे वडील रावसाहेब कमलाकर यांच्यासोबत येथील एका चौकामध्ये चहाचा गाडा चालवतात. तिचे वडील दोन्ही पायांनी अपंग आहेत. तरीही संसाराचा गाडा चालविण्यासाठी ते आजही न थांबता काम करत आहेत. त्यांच्या वडिलांचे तसेच पत्नीची सुद्धा यामध्ये मोठी साथ मिळते. ते येथील दुकानदारांना, शाळेत जाऊन ते चहा विकतात. तर या सर्व व्यवसायावर घरखर्च आणि निकितासाठी लागणारा खर्च भागत नसल्याने तिचे आई येथील श्री दत्त साखर कारखाना येथे दवाखान्यात सेविका म्हणून काम करतात. वडील जरी अपंग असले तरी आपल्या मुलीने मात्र गगनभरारी घेत संपूर्ण जगभरार आपलं नाव करावे असे त्यांचे स्वप्न आहे. त्यानुसार मुलीने सुद्धा आता केलेल्या कामगिरीमुळे आपल्याला तिचा अभिमान असल्याचे ते सांगतात. शिवाय इथेच न थांबता यापुढेही अनेक स्पर्धांमध्ये ती नाव करेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'ऑलम्पिक हेच ध्येय' : या स्पर्धेत दोन पदक प्राप्त करून आनंद तर झाला आहेच. शिवाय देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवायचे होते ते मी मिळवले आहे. मात्र माझा प्रवास इथेच न थांबता यापुढेही जाऊन मला ऑलम्पिकमध्ये पदक मिळवायचे आहे. देशाचे आणि कोल्हापूरचे नाव जगभरात करायचे असल्याचे तिने म्हटले आहे.
हेही वाचा - Neeraj Chopra : कमालच! नीरज चोप्राची एकदाच भालाफेक, पात्रता स्पर्धेत अंतिम स्थान