कोल्हापूर - दहशतवादी संघटना आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने आज देशातील 6 राज्यांत 13 ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड येथेही छापेमारी केली आहे. कोल्हापुरात करण्यात आलेल्या छापेमारीत एनआयएने दोन सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. इर्शाद शेख आणि अल्ताफ शेख, असे ताब्यात घेतलेल्या दोन भावांची नावे आहेत. या दोघांचा आयसीसशी संबंध असल्याचा एनआयएला संशय ( nia raid in kolhapur detained two brothers ) आहे.
नेमक काय घडलं? - इर्शाद शेख आणि अल्ताफ शेख हे कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळमधील अंबाबाई नगर येथे राहतात. येथील घरात एनआयएने छापा टाकून दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतलं. पहाटे 3 ते चार वाजता 15 जणांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती आहे. हे दोघेही तरुण मूळचे इचलकरंजी मधील रहिवासी आहेत. त्यांचा चांदीचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते हुपरी रेंदाळ येथे वास्तव्यास आले आहेत. दुसरीकडे त्यांनी लब्बैक फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असल्याचेही भासवले असल्याचा संशय एनआयएला आहे. गेल्या 3 वर्षांपासून या फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शिवाय मुंबईमध्ये त्यांचे कनेक्शन समोर आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
एनआयएनच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार मध्यप्रदेशातील भोपाल आणि रायसेन जिल्ह्यात छापे टाकले आहेत. गुजरातमधील भडौच, सूरत, नवसारी आणि अहमदाबाद येथे कारवाई करण्यात आली आहे. बिहारमध्ये अररिया, कर्नाटकमधील भटकल आणि तुमकुर जिल्ह्यात छापा टाकण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील देवबंदमध्ये आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड येथे एनआयएने छापेमारी टाकत कारवाई केली आहे.
हेही वाचा - NIA Raid In Kolhapur : आयसीस कनेक्शन प्रकरणी कोल्हापुरात NIA चा छापा; दोघांना घेतले ताब्यात