कोल्हापूर/सांगली - सध्या देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. लसीकरणाचा तुटवडाही मोठ्याप्रमाणात निर्माण झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. मात्र, एक-दोन इंजेक्शनमध्ये कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होईल, असा हमखास दावा अजूनपर्यंत कोणीही केला नाही. जगभरात अनेकजण यावर अजूनही संशोधन करत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातल्या 'आयसेरा बायोलॉजीकल' या औषध निर्माण कंपनीने हा दावा केला असून त्यांनी 'अँटीकोव्हिड सीरम' नावाचे इंजेक्शन बनवले आहे. काय आहे याचे वैशिष्ट्य आणि कंपनीने नेमका काय दावा केला आहे, यावरचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट...
कुठे आहे कंपनी; इजेक्शनचा कसा होणार वापर-
सांगली जिल्ह्यातल्या शिराळामध्ये गेल्या काही वर्षांपासून औषध निर्माण क्षेत्रात काम असलेल्या 'आयसेरा बायोलॉजीकल' या कंपनीने कोरोनावर 'अँटीकोव्हिड सीरम' नावाचे इंजेक्शन तयार केले असून रुग्णांना दोन इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो असा या कंपनीतील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. हे इंजेक्शन काय आहे हे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोरोनाचे विषाणू घोड्याच्या शरीरात टोचून त्याच्या शरीरात अँटिबॉडीज तयार करायचे. त्यानंतर अँटीबॉडीज असलेल्या घोड्याच्या रक्तातील 'अँटीसेरा' काढून तयार केलेले इंजेक्शन कोरोना रुग्णांना द्यायचे, अशी ही प्रक्रिया असल्याचे 'आयसेरा बायोलॉजीकल' चे संचालक दिलीप कुलकर्णी आणि नंदकुमार कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. तसेच या इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो, याचा हमखास दावा सुद्धा कंपनीने केला आहे.
परवानगी रखडली; खासदार मानेंकडून पाठपुरावा सुरू-
आयसेरा या कंपनीला संशोधन करून 'अँटिकोव्हिड सीरम' हे कोरोना प्रतिबंधात्मक इंजेक्शन तयार करण्यात यश आले आहे. या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून मानवी वापराच्या चाचणीसाठी मात्र आता 'आयसीएमआर'च्या परवानगीची त्यांना प्रतीक्षा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा पाठपुरावा सुरू केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेन्सना तसेच भयानक म्युटेंटवरही हे इंजेक्शन एक जालीम उपाय असेल, असा दावा या कंपनीने केला आहे. त्यामुळे 'आयसीएमआर' यासाठी परवानगी देणार का? हे पाहावे लागणार आहे.
खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा -
यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, संपूर्ण जगभरात कोरोना होऊ नये यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र कोरोना झाल्यानंतर शाश्वत असा उपचार अजूनही कुठे उपलब्ध नाहीये. मात्र शिराळा सारख्या दुर्गम भागातील आयसेरा कंपनीने मात्र कोरोनावर इंजेक्शन तयार केल्याचा दावा केला आहे. मात्र आता त्यांच्या या इंजेक्शनला आयसीएमआरच्या परवानगीची गरज असून त्यांच्यासाठी पाठपुरावा करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया फास्टट्रॅकवर जावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही खासदार माने यांनी म्हटले आहे.
3 लाख इंजेक्शन तयार -
आयसेरा बायोलॉजीकल या कंपनीने बनलेल्या 'अँटीकोव्हिड सीरम' नावाच्या इंजेक्शनचे तब्बल 3 लाख डोस सध्या तयार करून ठेवले आहेत. भविष्यात जर हे यशस्वी ठरले तर महिन्याला 9 लाखांपर्यंत डोस द्यायची आपल्या कंपनीची तयारी असल्याचेही कंपनीचे संचालक दिलीप कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
इंजेक्शन तयार करण्यासाठी घोड्यांचा मोठा तबेला -
'आयसेरा' कंपनीने तयार केलेल्या या इंजेक्शनमध्ये घोड्यांची देखील भूमिका महत्वाची आहे. कारण घोड्याच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजच्या माध्यमातून त्यातील 'अँटीसेरा' काढून हे इंजेक्शन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी घोड्यांचा मोठा ताबेला सुद्धा 'आयसेरा बायोलॉजीकल' कंपनीच्या आवारात आहे.
सीरम इन्स्टिट्यूटसह तीन कंपन्याच्या मदतीने तयार झाले इंजेक्शन -
'अँटीकोव्हिडं सीरम' हे इंजेक्शन बनविण्यासाठी सर्वात मोठी मदत ही सीरम इन्स्टिट्यूटची झाली होती. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट आणि प्रीमियम सीरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड नारायणगाव या दोन कंपन्यांचा मोठा हातभार लागला असून विशेष करून सीरम इन्स्टिट्यूटचे मोठे मार्गदर्शन मिळाले आहे, असे कंपनीचे संचालक नंदकुमार कदम यांनी म्हटले आहे. तिन्ही कंपन्यांनी मिळून चर्चा करून त्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. त्यामुळेच केवळ 4 महिन्यात हे इंजेक्शन बनविण्यात यश मिळाले असल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.