कोल्हापूर - उद्घाटन करण्यासाठी निमंत्रित केलेल्या आयुक्तांनी उद्घाटनाच्या दिवशीच मेडिकल मॉलवर प्लास्टिक वापरल्या प्रकरणी कारवाई केली आहे. यामुळे निमंत्रण दिलेल्या मालकांना घामच फुटला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्लास्टिक वापराविरोधात उचललेला बडगा निमंत्रण देणाऱ्यांना चांगलाच महागात पडला आहे.
शिवाजी चौक येथे आकाश मेडिकल माॅल मार्फत मधुमेह आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजत करण्यात आले होते. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आयुक्तांनी सहजच आकाश मेडिकल माॅलमध्ये फेरफटका मारला. यावेळी त्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी थेट विभागीय आरोग्य निरीक्षकांना बोलवून मेडिकलवर कारवाई करत त्यांना पाच हजारांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले.
काही दिवसांपूर्वी कलशेट्टी पुरस्कार वितरण कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांना ट्रॉफीवर प्लास्टिक असल्याचे आढळले. या कार्यक्रमात आयुक्तांनी संयोजकांना खडसावले. तसेच कार्यक्रमात प्लास्टिक कपमधून चहा देणाऱ्यावर देखील ते कडाडले.