कोल्हापूर - ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी केलेल्या वक्तव्याचे कुणीही वाईट वाटून घेऊ नये. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्याबद्दल बोलत असताना अनावधानाने माझ्याकडून काही शब्द बोलले गेले. पण माझा बोलण्याचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेऊन त्या वक्तव्याचा जास्त गाजावाजा झाला. माझा त्यांच्याबद्दल बोलण्याचा काहीच हेतू नव्हता, असे राजू शेट्टींनी म्हटले आहे.
शेट्टी म्हणाले, देशातील सैन्यात शेतकऱ्यांची मुले भरती होऊन देश सेवा बजावतात. सीआरपीएफच्या जवानांना अद्यापही केंद्र सरकारने सैनिकांचा दर्जा दिलेला नाही. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेली ही शेतकऱ्यांची मुले आहेत. तरीही त्यांना सरकारने शहीदांचा दर्जा दिलेला नाही. कारण त्यासाठी केंद्र सरकारने कायदा करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी गेली ५ वर्षे मोदी सरकारकडे पाठपुरावा केला होता. तरीही माझ्या पत्राला साधे उत्तर देखील या सरकारने दिले नाही, असेही यावेळी शेट्टी म्हणाले. त्यामुळे सैन्यात सर्वाधिक जवान आमच्या शेतकऱ्यांचीच असून देशपांडे अथवा कुलकर्णींची मुलं सैन्यात नसल्याचे केलेले वक्तव्य माझ्याकडून अनावधानाने केले गेले आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे शेट्टींनी म्हटले आहे.
शेतात शेती करत करत आमचा बाप दर मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो. सरकारने शेतीकडेही लक्ष दिले नाही, व सैन्यातील जवानांकडेही लक्ष दिले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.