कोल्हापूर - शहरांसह ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांच्या तर नोकऱ्या सुद्धा गेल्या आहेत. या सर्वांसाठी काहीतरी करावे या हेतूने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या सर्वच ग्रामीण बँकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन युवकांना कशा पद्धतीने व्यवसायामध्ये पतपुरवठा करून मदत करता येईल, या संदर्भात चर्चा झाली. शिवाय या सर्वांना कशापद्धतीने जास्तीत जास्त कर्ज दिले जाऊ शकते यावरही सविस्तर चर्चा झाली असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीमध्ये तब्बल 22 सहकारी बँकांनी सहभाग नोंदवला होता.
'अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवकांना कर्ज द्यावी'
घाटगे म्हणाले, की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी युवकांनी व्यवसायात यावे यासाठी याआधीही प्रयत्न केले आहेत. या उद्देशानेच आपल्या जिल्ह्यातील तरुणसुद्धा व्यवसायाकडे वळावेत, त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त कर्ज कशापद्धतीने देता येईल, याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळमधूनसुद्धा युवकांना कर्ज द्यावीत, यासंदर्भात उपस्थित बँकांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. चर्चेनंतर अनेकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे घाटगे यांनी म्हटले.
'प्लॅन A'सोबत 'प्लॅन B'सुद्धा असला पाहिजे - घाटगे
घाटगे पुढे म्हणाले, की युवकांनी नोकरी करत असताना किंव्हा आयुष्यात काहीही करत असताना त्यांच्याकडे प्लॅन A'सोबत 'प्लॅन B'सुद्धा असला पाहिजे. मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंड होतो. मात्र वडिलांच्या निधनानंतर मला या 'प्लॅन B'मध्ये यावे लागले. त्यासाठी यंत्रणा तयार होती. मात्र सध्या युवकांनी सुद्धा 'प्लॅन B' तयार ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून पाठबळ देण्यासाठी आज ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती, असेही त्यांनी यावेळी म्हटले. व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्याबाबतसुद्धा अनेकांच्या शंका होत्या, त्यावर चर्चा झाली असून अनेकजण सकारात्मक असल्याचेही घाटगे यांनी म्हटले.
'जास्तीत जास्त युवकांना कर्जपुरवठा करण्याबाबत प्रयत्न करणार'
आपणसुद्धा विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला असल्याचे सांगत समरजित घाटगे म्हणाले, की केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्यातील अनेक जिल्ह्यात कशापद्धतीने युवकांना मदत होईल, यासंदर्भात समन्वय साधून चर्चा करणार. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत काम करत असलेल्या नागरी बँकांच्या पद्धधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. ही पहिली बैठक असली तरी यामधून काहीतरी साध्य होईल आणि जास्तीत जास्त युवकांना व्यवसाय, उद्योगांसाठी कर्ज मिळतील, अशी अनेकजण आशा करत आहेत.