कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यवसाय सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर व्यापारी संघटनेने यावर आनंद व्यक्त केला आहे. सनई-चौघड्यासह वाजत-गाजत बैल गाडीतून जल्लोष मिरवणूक काढत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत संघटनेने केले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय सुरू करण्याबरोबरच लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी पुढील आठ दिवस विविध ऑफर जाहीर करत, व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा पुन्हा श्रीगणेशा केला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. व्यावसायिकांसह कर्मचाऱ्यांना बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनेने केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शंभर दिवसांपासून व्यवसाय बंद आहेत. पहिल्या लाटेत जवळपास सहा महिने व्यवसाय ठप्प राहिल्यानं अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. तर दुसर्या लाटेत अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. कोल्हापुरातील व्यवसाय सुरू करावा अशी मागणी करत व्यापारी संघटनेने आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते.
राज्य सरकारकडून परवानगी
सध्या कोल्हापूर जिल्हा फेज-3 मध्ये आल्यानंतर राज्य सरकारने कोल्हापुरातील व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापुरातील सर्व व्यवसाय नियम पाळून सात ते चार या वेळेत सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजेपासून व्यापाऱ्यांनी शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू ठेऊन याला प्रतिसाद दिला.
सनई-चौघडा वाजवून, पेढे भरवून स्वागत
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी राजारामपुरी परिसरात राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. शिवाय सनई चौघडा वाजवत बैलगाडी मिरवणूक काढत जनजागृती केली. राज्य सरकारचे सर्व नियम पाळून व्यवसाय सुरू करत असल्याचा आनंद होत आहे. शिवाय येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर बंधनकारक करत असल्याचं व्यापार यांच्याकडून सांगण्यात आले.
लस घेतल्यास व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ऑफर
सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवसाय सुरू झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय देखील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लस घेतलेल्या ग्राहकांना वस्तूंच्या खरेदी किंमतीत विशेष टक्केवारीत व्यापाऱ्यांकडून सूट देण्यात येत आहे. पुढील आठवडाभर ही ऑफर लागू असेल,असे देखील व्यापारी संघटनेने सांगितले आहे.
हेही वाचा - कोल्हापूरमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर, केंद्रीय पथकाशी सहमत नाही -राजेश टोपे