कोल्हापूर : भारतातील सर्वात मोठे अंडे कोल्हापूरात पाहायला मिळाले आहे. येथील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्री मध्ये हे अंडे मिळाले असून त्यांनी हे देशातील सर्वात मोठं अंडे असल्याचा दावा केला आहे. या अंड्याचे वजन जवळपास 210 ग्रॅम इतके भरले असून हे अंडे पाहायला आता परिसरातील नागरिक गर्दी करत असून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.
एवढे मोठे अंडे पाहून पोल्ट्री मालक चव्हाण सुद्धा अवाक झाले : तळसंदे मधील दिलीप चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून या पोल्ट्री व्यवसायात आहेत. मात्र त्यांच्या पोल्ट्री मध्ये पहिल्यांदाच एका कोंबडीने एवढे मोठे अंडे दिल्याने ते सुद्धा अवाक झाले. एका हातामध्ये बसेल एवढा मोठा या अंड्याचा आकार असून त्याचे वजन सुद्धा करून पाहिले तर ते तब्बल 210 ग्रॅम इतके भरले. सर्वसाधारण अंडी ही कमी वजनाची असतात. मात्र एवढे मोठे अंडे असल्याने त्यांनी सुद्धा देशात कुठे असे अंडे आढळले आहे का पाहिले तर यापेक्षा कमीच वजनाचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्याकडे सापडलेले अंडे हे आत्तापर्यंत तरी देशात सर्वात मोठे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.