कोल्हापूर- स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्नील लोणकर हा राज्य सरकारच्या धोरणाचा बळी ठरला आहे. समाजात असे अनेक स्वप्नील आहेत, त्यांना न्याय देण्याची गरज आहे. राज्य सरकारने स्वप्नीलच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करावी, अशी मागणी करत कोल्हापुरात भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकाराविरोधात जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या नैराश्यातून पुण्यातील फुरसंगी येथील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. लोणकर प्रमाणे मराठा आरक्षणावरून एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. या नैराश्यातूनच स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. सरकार आणखी किती अंत पाहणार आहे, असे म्हणत भाजपाने महाविकास आघाडी सरकार विरोधात टीकेची झोड उठवली.
2185 तरुणांच्या नियुक्त्या रखडल्या-
कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सरकारने 2185 तरुणांच्या नियुक्त्या रखडवल्या आहेत. परीक्षा होऊन देखील अद्याप नोकरीवर सामावून घेतलं नाही. त्यामुळे राज्यसेवेच्या परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच लोणकर यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत द्यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.