कोल्हापूर - प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-अहमदाबाद-पुणे रेल्वे आता कोल्हापूरपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभाग पुणे येथून देण्यात आली आहे.
असे असेल वेळापत्रक
कोल्हापूर -अहमदाबाद साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 01050) १० जुलैपासून दर शनिवारी कोल्हापूरवरून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी निघेल. ही गाडी हातकणंगलेला दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी, मिरजला २ वाजून १० मिनिटांनी, सांगलीला २ वाजून २५ मिनिटांनी, साताऱ्याला ४ वाजून ३० मिनिटांनी, पुण्यात रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ती अहमदाबाद येथे पोहोचेल.
कोल्हापूरला २.४०ला पोहोचेल
अहमदाबादवरून ही साप्ताहिक रेल्वे (क्र. ०१०४९) ११ जुलैपासून दर रविवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर, साताऱ्याला सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी, सांगलीमध्ये १२ वाजून ४५ मिनिटांनी तर, मिरजला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी, हातकणंगलेला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. कोल्हापूरला दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी पोहोचेल.
वेळापत्रकात कोणताही बदल नाही
या गाडीला एक सेकंड एसी, तीन थ्री टायर एसी आणि ६ सेकंड सिटींग डबे असतील. तसेच पुणे-अहमदाबाद दरम्यानच्या स्थानकांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.