कोल्हापूर - मटक्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या राजारामपुरी पोलिसांना मटका चालकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार यांनी विष्णू काशिनाथ माने आणि विजय युवराज बागडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच मटका बुकीचा मालक योगेश अभंगे (वय ४२) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागील बाजूला दोन व्यक्ती मटका खेळत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी याठिकाणी मटका घेणारे विष्णू माने व विजय बागडे या दोघांना पकडण्यात आले. मात्र, या दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर दगडफेक केली. तसेच त्यांना पुन्हा पकडताच त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू माने व विजय बागडे या दोघांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाइल असा सुमारे ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांसह या मटका बुकीचा मालक योगेश अभंगे अशा तिघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या मटका बुकीचा मूळ मालक योगेश अभंगे हा जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मटक्याचे कनेक्शन कोल्हापूर ते अंमळनेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस मूळ मटका मालकाचा शोध घेत आहेत.