कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुढे येऊ घातलेला नवरात्र व शाही दसरा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, १७ ते २५ ऑक्टोबर याकाळात नवरात्र उत्सव व शाही दसरा उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. याकाळात नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घट होत असली तरी, गर्दी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव व दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करा, असे आवाहन केले आहे.
शाही दसरा सोहळा दिवशी नागरिकांनी गर्दी टाळावी. विजयादशमी दिवशी कोल्हापूरातील दसरा चौकात मोठ्या उत्साहात शाही दसरा सोहळा संपन्न होत असतो. सोने लुटण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर या दसरा चौकात एकवटले असतात. मात्र यंदा कोरोनामुळे शाही दसरा साजरा करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. पण नागरिकांनी शाही दसरा सोहळ्यात गर्दी टाळावी. मास्क सॅनिटायझर सोबत बाळगावे. शक्यतो गर्दीचे ठिकाण टाळावे असे आवाहन, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.