कोल्हापूर- कोल्हापूर महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, त्यामुळे इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र उमेदवारांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा गतीमान झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणारी निवडणूक कोरोनामुळे पूढे ढकलण्यात आली असून, ती पुढील महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. गल्लोगल्ली गाठीभेटी, कॉर्नरसभा सुरू झाल्या असून, महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला जोर आला आहे. मात्र इच्छुक उमेदवार या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेक उमेदवारांनी तर मास्क घातला नसल्याचे समोर आले आहे. उमेदवार प्रचारामध्ये सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य याविषयी बोलतात मात्र प्रत्यक्षात तेच उमेदवार मतदारांचा जीव धोक्यात घालत आहेत.
दुर्लक्ष केल्यास मतदारांच्या जीवाला धोका
अनेक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असताना मास्क बाजूला ठेवला आहे. प्रचारादरम्यान लोकप्रतिनिधी अनेकांच्या संपर्कात येत असतो, त्यांना सर्वांच्या घरी जावे लागते, अशावेळी जर उमेदवारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास मतदारांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अनेक प्रभागांत महिलांच्या हळदी -कुंकू कार्यक्रमाला जोर आला आहे. महिला या कार्यक्रमांना गर्दी करतात. मात्र अशा कार्यक्रमांमध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत.
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरवातीपासून कोरोना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्यांचेच कार्यकर्ते या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.