कोल्हापूर - येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील अंबाबाईचे मंदिर सुद्धा त्याच दिवशी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात व अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एका तासात अंदाजे 700 लोकांना दर्शनाची सुविधा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात सर्व भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. याद्वारे प्रत्येक तासाला अंदाजे 700 भाविकांना दर्शन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून ऑनलाईन बुकिंग करण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला 7, 8 व 9 ऑक्टोबर 2021 अशा तीन दिवसाचे ऑनलाईन बुकिंग भाविकांना करता येणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांचे बुकिंग हे करता येईल. ऑनलाईन बुकिंग साठी www.mahalakshmikolhapur.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे ही वाचा - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश
अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची सर्व तयारी पूर्ण -
दरम्यान, येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून मंदिराची स्वच्छता सुरू होती. आता ती पूर्ण झाली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेत मंडप घालण्यात आला आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे आता भक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असून कधी एकदा अंबाबाईचे दर्शन घेणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.
हे ही वाचा - शारदीय नवरात्रौत्सावाची तयारी जोरदार सुरू..अंबाबाईच्या रत्नजडित किरीटसह सोन्याच्या दागिन्यांना झळाळी