कोल्हापूर - जगातील सर्वात जास्त प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे इंग्लंडची विम्बल्डन स्पर्धा ( Wimbledon 2022 )आणि या स्पर्धेत कोल्हापूरची अवघ्या 14 वर्षाची ऐश्वर्या जाधव हिने भारताचा झेंडा झळकवणारी पहिली मुलगी होण्याचा मान घेतला आहे. हिरवळीवर खेळल्या जाणार्या या स्पर्धेत तिला 4 सामने गमवावे लागले असले, तरी आयुष्यभर उपयोगी पडेल, असा अनुभव तिने उराशी बाळगत पुढील प्रवासाला निघाली आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भक्कम प्रोत्साहन आणि पाठबळामुळे कोल्हापूरची क्रीडा परंपरा विकसित झाली आहे. कोल्हापुरातील अनेक खेळाडूंनी देशासह परदेशात कोल्हापूरच नाव लौकिक केले आहे. या खेळाडूंच्या नावातच आणखी एक नवा चमकता तारा म्हणजे लॉन टेनिसपटू ऐश्वर्या जाधव ( Aishwarya Jadhav Kolhapur ) हिचे नाव जोडण्यात आले आहे. दरम्यान ती आज कोल्हापुरात परतली आहे. यानंतर तिने तेथील अनुभव शेअर केले आहेत.
शेतकरी कन्याची विम्बल्डन स्पर्धेत धडक - मूळची पन्हाळा तालुक्यातील यावलुज येथील शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या ऐश्वर्याचा जन्म 4 ऑक्टोबर 2008 चा ग्रामीण भागात झाला. ऐश्वर्या जाधवने अल्पावधीत राज्य- राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड करत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. आई- वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सीनिअर केजीपासूनच लॉन टेनिस खेळण्यास सुरुवात केली. मुलांचे शिक्षण आणि ऐश्वर्याला टेनिस खेळात करिअर करता यावे, यासाठी जाधव कुटुंबीयांनी यवलूज गाव सोडून शहरात राहण्याचा निर्णय घेतला. जाधव कुटुंबीय सध्या सर्किट हाऊस परिसरात भाड्याच्या घरात राहत आहे. घरात सर्वत्र पाहिले तर ट्रॉफी आणि पदक पाहायला मिळतात. ऐश्वर्याचे वडील दयानंद जाधव लॅण्ड सर्व्हेअर तर आई अंजली जाधव गृहिणी आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळाला - लॉन टेनिसची प्रचंड आवड असणाऱ्या ऐश्वर्याने लहानपणापासून या खेळाचा सराव केला. अनेक सामने ही खेळले यामुळे इंग्लंड येथे होणार्या विम्बल्डन स्पर्धेच्या 14 वर्षांखालील गटात ऐश्वर्याला जाण्याची संधी मिळाली. तिने तेथे आशियाई संघाचे प्रतिनिधित्व केले. इतकेच नव्हे, तर या स्पर्धेत लहान वयात सहभागी होणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. विम्बल्डन येथील स्पर्धेत ऐश्वर्याला 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. यापैकी एका सामन्यात पुढे चाल देण्यात आली. उर्वरित 4 सामन्यांत ऐश्वर्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना अटीतटीची झुंज दिली आहे. मात्र, प्रोफेशनल व अनुभवी खेळाडूंच्या विरुद्ध तिला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळाला, जो तिला तिझ्या भविष्यासाठी अनुभवी ठरणार आहे.
हेही वाचा - Rishi Sunak : ब्रिटन पंतप्रधानपद शर्यतीच्या पहिल्या फेरीत ऋषी सुनक अव्वल, दुसऱ्या फेरीत 6 उमेदवार